
अपूर्वा सामंत यांची युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती
राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे) युवा महिला नेत्या अपूर्वा किरण सामंत यांची युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र युवासेना महाराष्ट्र राज्य कमिटीकडून अपूर्वा सामंत यांना दिले आहे.
अपूर्वा या तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक ठरल्या होत्या. अपूर्वा किरण सामंत फांउडेशनच्या माध्यमातून महिलांना संघटीत करून राजापूरात शिवसेनेत महिलांची फळी मजबूत केली. तसेच तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) पक्ष मजबूत करण्याचे उत्कृष्ट काम केले असून शिवसेनेचे युवा नेतृत्व म्हणूण त्या घराघरात पोचल्या आहेत. या त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीची वरिष्ठांकडून दखल घेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक, महाराष्ट्र राज्य युवासेना सचिव किरण साळी, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार अपूर्वा सामंत यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल राजापूर शिवसेना पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार किरण सामंत, जिल्हा उपप्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, स्वीय सहाय्यक प्रसन्न मालपेकर, तालुका संघटक भरत लाड तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.




