
चिपळूण नगरपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादीच्या दोन जागांच्या आग्रहामुळे महायुतीचे घोडे अडले, चेंडू पालकमंत्र्यांच्या मैदानात
*चिपळूण नगर परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सावर्डे येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनौपचारिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन वादग्रस्त जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्यासच नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेऊ, असा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठवण्यात आला.
सावर्डे येथील पक्ष कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय पुन्हा एकदा निश्चित करण्यात आला. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले मिलिंद कापडी यांच्याशीही यावेळी चर्चा झाली. प्रभाग क्र. ९ आणि १० मधील प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादीने महायुतीच्या वाटणीमध्ये मागितली होती. मात्र अद्याप या दोन जागांवर तोडगा निघालेला नाही. पुढील दिवसांत तोडगा निघेल, अशी आशा बैठकीतून व्यक्त करण्यात आली.
यापूर्वी महायुतीत नगराध्यक्ष पद शिंदे सेनेला देण्यास राष्ट्रवादीने सहमती दर्शवली होती. त्यानुसार जागावाटपात राष्ट्रवादीला १० आणि भाजप व शिंदे सेनेला प्रत्येकी ९ जागा देण्याचे निश्चित झाले होते. तरीही भाजपने सुरुवातीलाच निश्चित ५ जागांपैकी २ जागांवर कोणतीही चर्चा न करता उमेदवारी दाखल केली.
दरम्यान, प्रभाग ९ आणि १० मधील उमेदवार राष्ट्रवादीने आधीच ठरवले होते आणि त्याला पालकमंत्री उदय सामंत यांनीही मान्यता दिली होती. त्यामुळे आता या दोन्ही जागा राष्ट्रवादीला दिल्यासच नगराध्यक्ष पदाचा मिलिंद कापडी यांचा अर्ज मागे घेतला जाईल, अशी अट पुन्हा एकदा पुढे ठेवण्यात आली आहे.
या घडामोडींमुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी दोघांचीही नजर पालकमंत्री सामंत यांच्या अंतिम भूमिकेकडे लागून राहिली आहे.




