
मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटे येथील ओव्हरब्रिजवरस्विफ्ट’ कारची रिक्षाला जोरदार धडक, रिक्षाचालकाचा मृत्यू
मुंबई गोवा मार्गाचे चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक अपघात घडले आहेत
मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटे येथील ओव्हरब्रिजवर भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या एका ‘स्विफ्ट’ कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक अल्ताफ हसन ठाकूर (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाल्याची १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.१५ वाजता घडली आहे. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील असगणी मोहल्ला येथील रहिवासी असलेले अल्ताफ हसन ठाकूर हे त्यांच्या मालकीच्या एमएच ०८/BC/२७८७ क्रमांकाच्या रिक्षातून एका साक्षीदारासोबत चिपळूण येथे डॉक्टरांकडे गेले होते. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ते रिक्षाने पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाने लोटे बाजूकडे परत येत होते.
सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा पिरलोटे येथील ओव्हरब्रिजच्या वरील बाजूस पोहोचली, त्याचवेळी त्यांच्या उजव्या बाजूने सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार (क्र. MH 02/DN/७२३४) भरधाव वेगात येत होती. या कारचा चालक पुनित मधुकर नायक (वय ३९, रा. पिरलोटे, ता. खेड) याने अचानकपणे आणि बेदरकारपणे आपली लेन सोडली आणि भरधाव वेगात रिक्षाच्या डाव्या बाजूस घुसून रिक्षाला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच रिक्षा उजव्या बाजूला रस्त्यावर पलटी झाली. दुर्दैवाने, रिक्षाचालक अल्ताफ हसन ठाकूर हे रिक्षाखाली सापडले आणि रिक्षासह फरफटत जाऊन पुलाच्या कठड्याला धडकून थांबले. या अपघातात अल्ताफ ठाकूर यांना गंभीर आणि किरकोळ दुखापती झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.




