
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील सेवानिवृत्त शिक्षकांच्या खात्यातील सायबर चोरट्याने साडेसात लाख रुपये लांबवले
रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार सायबर गुन्हे होत असून दरवेळी सायबर गुन्हेगार नवीन नवीन क्लुप्त्या शोधत असल्याने त्यामध्ये अनेकांची फसवणूक होत आहे
रत्नागिरी तालुक्यातील जयगड (ता. जि. रत्नागिरी) येथे एका अज्ञात सायबर चोरट्याने व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करून दोन सेवानिवृत्त शिक्षकांच्या खात्यातून साडेसात लाख रुपये लांबवल्याची घटना समोर आली. एका शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ₹६,८५,५१४/- आणि दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यातून ₹७१,०००/- अशी एकूण ₹७,५६,५१४/- रुपयांची मोठी रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयगड येथील अकबर मोहल्ला परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक नासिर अब्दुल्ला बावडे (वय ६१) यांनी या फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.४५ ते १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७.३० च्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. फिर्यादी बावडे हे ज्या ‘सेवानिवृत्त शिक्षकांचे संदखोल केंद्र’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत, त्याच ग्रुपवर आरोपी असलेल्या अज्ञात मोबाईल धारकाने ‘बँक ऑफ इंडिया’ संबंधित माहितीची एक अनोळखी आणि बनावट ‘पीडीएफ’ तसेच एक ‘एपीके’ (APK) फाईल पाठवली.
फिर्यादी नासिर बावडे यांनी ही अनोळखी फाईल आपल्या मोबाईलमध्ये ‘डाऊनलोड’ करून उघडताच, आरोपीने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस (नियंत्रण) मिळवला. यानंतर आरोपीने बावडे यांच्या ‘बँक ऑफ इंडिया’च्या पगार खाते आणि बचत खात्यामधून त्यांच्या परवानगीशिवाय ६ लाख ८५,५१४/- इतकी मोठी रक्कम परस्पर अनोळखी बँक खात्यावर वळती केली. विशेष म्हणजे, आरोपीने याच पद्धतीने साक्षीदार शिला शंकर वाघचरे (रा. अंबुवाही) यांच्या ‘बँक ऑफ इंडिया’ खात्यामधून देखील ₹७१,०००/- रक्कम काढून घेतली. अशाप्रकारे फिर्यादी आणि साक्षीदार दोघांची मिळून एकूण ₹७,५६,५१४/- रुपयांची फसवणूक झाली.
सायबर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच, बावडे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गु.र.नं. ५०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




