
राजापूर नगरपालिका निवडणूक
नगराध्यक्ष पदाचा एक, तर सहा नगरसेवकांचे अर्ज छाननीत अवैध
राजापूर : राजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या एकूण पाच अर्जांपैकी अपक्ष उमेदवार जान्हवी जितेंद्र करंगुटकर यांचा अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला आहे. तर नगरसेवक पदासाठीच्या सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
राजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच, तर नगरसेवक पदासाठीच्या २० जागांसाठी ६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज (१८ नोव्हेंबर) निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या प्रमुख उपस्थीतीत झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला जान्हवी करंगुटकर यांचा अर्ज बाद झाला.
त्यामध्ये प्रभाग ४ अ मधून शीतल पटेल यांनी भाजपा पक्षामार्फत दाखल केलेल्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉम न जोडल्याने तो अवैध ठरविण्यात आला. मात्र त्यांचा अपक्ष अर्ज वैध धरण्यात आला आहे. प्रभाग क्र. ४ ब मधून सुशांत विनायक पवार यांचा अर्ज देखील पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला. तर याच ४ ब मधून दिलीप अमरे यांचा डमी अर्ज बाद ठरविण्यात आला. प्रभाग ६ अ मधून समृद्धी रहाटे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज दाखल केला होता; मात्र एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग क्रं. ८ अ मधून प्रगती प्रकाश फोडकर यांचा अर्ज देखील पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला. प्रभाग १० मधून आनंद जयवंत दुधवडकर यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज अर्जावर योग्य सह्या नसल्याने अवैध ठरविण्यात आला.
आता २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच राजापूर नगरपालिका निवडणुकीचे लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.




