
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे, ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. शिव गोपाल मिश्रा
गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे महामंडळाच्या खासगीकरण आणि भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणावर चर्चा होत आहेत. मात्र, खासगीकरण होऊ देणार नाही, पण कोकण रेल्वेचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर लवकरात लवकर कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. शिव गोपाल मिश्रा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे ७१ वे वार्षिक अधिवेशन बुधवारी आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मिश्रा यांनी संघटनेच्या येथील कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी संघटनेचे कॉ. जे.आर. भोसले, महासाचिव वेणू पी. नायर, रत्नागिरीतील नेते कुमार घोसाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण रेल्वेसाठी दिवंगत मधु दंडवते यांचे मोठे योगदान आहे. आज या रेल्वेचा जो विकास झाला आहे, त्यात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या संघटनेचे रेल्वे कर्मचार्यांच्या हितासाठी प्रारंभापासून महत्त्वाचे योगदान राहिले आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
कर्मचार्यांच्या हिताचे अनेक प्रलंबित प्रश्न आजही आहेत, ज्यात आठवा वेतन आयोग, २५ टक्के महागाई भत्ता, महागाई सवलत अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने २०२५ मध्ये हा वेतन आयोग कर्मचार्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वेतन आयोगाचा लाभ कर्मचार्यांना मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com




