
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नेट/ सेट कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा (नेट) आणि राज्य पात्रता चाचणी परीक्षा (सेट) यासाठी तयारी आणि सराव करण्यासाठी र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कलाशाखा आणि अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले.
तेजस कळंबटे आणि अपूर्वा राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत पदव्युत्तर स्त्रावरील भाषा आणि सामाजिक शास्त्राचे ३० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
उच्च शिक्षणात अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी नेट आणि सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पहिला पेपर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी श्री. कळंबटे यांनी गणितीय कौशल्यांवर प्रकाश टाकला, तर श्रीमती राणे यांनी उच्च शिक्षण स्वरूप, संरचना आणि बदल यावर प्रकाश टाकला.
कार्यशाळेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेची भूमिका विषद केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतील मार्गदर्शक श्री. कळंबटे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना आठल्ये यांनी दोन दिवशीय कार्यशाळेचा मागोवा घेऊन अशा कार्यशाळांची सातत्याने गरज असल्याचे सांगितले. यावेळी अलिशा कांबळे आणि प्रीती टिकेकर या प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यशाळेसाठी अकादमीच्या ॲड. सोनाली खेडेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच अकादमीतील श्रीमती मोरे यांचेही सहकार्य मिळाले. पदव्युत्तर स्तरावरील सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.



