
कॉपीमुक्तीची एकच मात्रा, ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ वापरा!’
गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभाग एकवटला; सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे.. पुस्तिकेचे जिल्ह्यांना वाटप
परीक्षा आणि ‘कॉपी’ हे जणू एकमेकांना घट्ट बिलगलेले शब्द! पण गेल्या वर्षी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने या ‘कॉपी’ला परीक्षेपासून दूर सारण्यात यशस्वी वाटचाल केली. आता या यशाला केवळ प्रशासकीय आकडेवारीपुरते मर्यादित न ठेवता, त्याला शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक मूल्यांच्या भावनिक जोड देण्यासाठी कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी तयार केलेल्या अनोख्या ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या महिनानिहाय वार्षिक नियोजन पुस्तिकेचे प्रतिनिधिक वाटप जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना गुरुवारी करण्यात आले.
ही पुस्तिका प्रशासकीय काम, शैक्षणिक गुणवत्ता आणि विशेष उपक्रमांच्या समन्वयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कोकण व कोल्हापूर विभागाच्या या पुस्तिकेचे वितरण म्हणजे प्रामाणिक यशाची आणि नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षणाची मशाल मंडळाकडून शाळांकडे सोपवण्याचा एक प्रेरणादायी क्षण होता. ही पुस्तिका राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठीही उपयुक्त व मार्गदर्शक अशी आहे. दिवाळीपूर्वी ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही विभागीय मंडळांनी त्यांच्या संकेतस्थळावर ही पुस्तिका शाळांसाठी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी बोलताना कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुस्तिकेबद्दल उत्कट भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “ही पुस्तिका केवळ एक वार्षिक वेळापत्रक नाही, तर शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि नैतिक संस्कारासाठी प्रेरणा देणारी मार्गदर्शिका ठरेल.” ‘कॉपीमुक्ती’ची सुरुवात आत्मविश्वासातून आणि शिस्तबद्ध नियोजनातून होते, हा कणखर संदेश त्यांनी शाळा प्रमुखांपर्यंत पोहोचवला.
या पुस्तिकेच्या निर्मितीत आणि वितरणात सर्व मुख्याध्यापक संघांनी दिलेले योगदान हे शैक्षणिक बांधिलकीचे प्रतीक आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघांच्या सहकार्याने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्यांनी छपाईसाठीही सक्रिय योगदान दिले आहे. या पाचही जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ती मोफत वितरित करण्यात येणार आहे, ज्यामुळे शिक्षणाचा हा ‘राजमार्ग’ प्रत्येक शाळेसाठी उपलब्ध होईल.
सचिव सुभाष चौगुले यांनी हा उपक्रम एका निरंतर प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “या वर्षीच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे, पुढील वर्षी ही पुस्तिका आणखीन दर्जेदार आणि समृद्ध बनवण्यात येईल.”
याप्रसंगी, नूतन उपसंचालिका प्रभावती कोळेकर यांचा एसएससी बोर्डाच्या वतीने अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशासकीय आणि शैक्षणिक बळ देणाऱ्या या उपक्रम सोहळ्याला बोर्डाचे सहसचिव बसवेश्वर किल्लेदार, सहाय्यक गजानन उकिर्डे, लेखाधिकारी प्रणती जमदग्नी, सातारा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी शिवाजी मलदोडे, सांगलीचे उपशिक्षणाधिकारी गणेश भांबोरे, कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण फाटक, बोर्डाचे वरिष्ठ अधीक्षक दीपक पवार, मनोज शिंदे, तसेच मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे, दत्तात्रय घुमरे, विभागीय अध्यक्ष बी बी पाटील, राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत आणि विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष राहुल पवार (कोल्हापूर), चंद्रकांत जाधव (सातारा), संजयकुमार झांबरे (सांगली), अयुब मुल्ला (रत्नागिरी), वामन तरफे (सिंधुदुर्ग) यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुस्तिकेची प्रमुख उद्दिष्ट्ये: यशाकडे नेणारे दहा स्तंभ
१. परीक्षा कामकाजात उत्तम सुसूत्रता व शिस्त.
२. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भरभराट.
३. प्रामाणिकता व नैतिक मूल्यांची (‘कॉपीमुक्तीची’) रुजवणूक.
४. मानसिक आरोग्य जपून ताणतणावाचे व्यवस्थापन.
५. पालक-शिक्षक-विद्यार्थी या तिघांचा सकारात्मक समन्वय.
६. सर्वांगीण विकासाला (करिअर, आरोग्य) सहाय्य.
७. कामात पारदर्शकता आणि अचूकता.
८. समावेशक दृष्टिकोन (रिपीटर/विशेष गरजा).
९. प्रेरणादायी व सकारात्मक शैक्षणिक वातावरण.
१०. मंडळ स्तरावर अचूक अहवालनासह गतिमानता.
पुस्तिकेची वैशिष्ट्ये: प्रभावी अंमलबजावणीची त्रिसूत्री
१. त्रिवेणी नियोजन प्रणाली (प्रशासन, शिक्षण, विशेष उपक्रम).
२. महिनानिहाय अंमलबजावणीची स्पष्टता.
३. नैतिक व सामाजिक शिक्षणाचे प्रभावी एकत्रीकरण (‘कॉपीमुक्ती’).
४. मानसिक आरोग्यालाही विशेष प्राधान्य (ताणतणाव व्यवस्थापन).
५. निदान आणि उपचारात्मक अध्यापन.
६. सर्वांगीण विकासाचा समतोल (आहार, आरोग्य, करिअर).
७. तंत्रज्ञान आधारित पारदर्शकता (ऑनलाईन प्रक्रिया).
८. शैक्षणिक उपक्रमात लवचिकता आणि समावेशकता.
९. दरमहा बैठकांमधून सततचा पाठपुरावा व आढावा.
१०. अध्यापनाची गती आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे.
(फोटो ओळ: ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या पुस्तिकेचे जिल्हा प्रतिनिधींना वाटप करताना कोल्हापूर व कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर. सोबत बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले, उपसंचालिका प्रभावती कोळेकर, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे व दत्तात्रय घुमरे, तसेच मुख्याध्यापक संघाचे विभागीय व जिल्हा अध्यक्ष यांच्यासह इतर मान्यवर.)




