
खेडमध्ये जागावाटपात शिवसेनेकडून भाजपची बोळवण
कार्यकर्ते नाराज : प्रमुख पदाधिकारी तातडीने मुंबईला रवाना
दापोली : खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रस्ताव देताना शिवसेनेने भाजपची केवळ ३ जागा देवून बोळवण केली आहे. हे जागा वाटप भाजपा कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणारे असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना वरिष्ठांना कळविण्यासाठी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तातडीने मुंबई येथे रवाना झाले आहेत.
खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व २० नगरसेवक यांच्या निवडणुकीबाबत शिवसेना व भाजप यांनी महायुती केली आहे. भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रवेश केल्यावर भाजपची खेडमधील ताकद वाढली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सन्मानपूर्वक जागा वाटप करावे, अशी भाजपच्या पदाधिकारी यांची इच्छा होती; मात्र शिवसेनेने केवळ ३ जागा भाजपला देऊ केल्या आहेत. नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपची एक प्रकारे चेष्टाच शिवसेनेने केली असल्याचा संदेश या निमित्ताने सर्वसामान्य मतदारांमध्ये गेला आहे.
भाजपने या निवडणुकीत उपनगराध्यक्ष व किमान ८ ते ९ जागांची मागणी केली होती; मात्र त्यांचा हाती केवळ ३ जागाच आल्या. याबाबत जनतेचे मत कार्यकर्त्यांनी जाणून घेतल्यावर भाजपच्या पदाधिकारी यांच्याजवळ त्यांनी संपर्क साधून आपल्या भावना व्यक्त केल्या.
महायुती म्हणून निवडणूक लढविताना सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अन्यथा स्वबळाचा पर्याय ठेवावा असा आग्रह बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यासाठी भाजपचे प्रमुख पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व रत्नागिरी जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत.




