
रत्नागिरी जिल्ह्यात सतर्कता व सुरक्षा उपाययोजना अधिक कडक

रत्नागिरी : राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर, संवेदनशील ठिकाणे, बाजारपेठा, रेल्वे स्थानक, बस स्थानके, धार्मिक स्थळे, लँडिंग पॉईंट्स, प्रमुख बंदरे, जेट्टी आदी दळण-वळणाच्या ठिकाणी कडक पोलीस गस्त, तपासणी व शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत स्थानिक पोलीस ठाणे, बॉम्ब शोध व नाश पथक (BDDS) यांच्या संयुक्त पथकांचा सहभाग असून, तसेच प्रशिक्षित स्निफर डॉग्स यांचा वापर करून संशयास्पद वस्तू, वाहने अथवा व्यक्तींची सखोल तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारी व खाडी किनारी सरकारी व खासगी बोट/ ट्रॉलटने पेट्रोलिंग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तपासणी नाका येथे नाकाबंदी केली असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी असणाऱ्या सर्व संवेदनशील कंपन्या, पोर्ट व गावे येथे सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर सागर रक्षक दल, सुरक्षा रक्षक व ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत व समुद्र मार्गाने उद्भवणारे संभाव्य धोके व दक्ष राहण्याबाबत माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत.
संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचाली दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक (०२३५२) २२२२२२, डायल-११२ अथवा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांच्या अधिकृत “समुद्र संदेश व रत्नागिरी पोलीस दलाचे “रत्नागिरी पोलीस” या व्हाट्सॲप चॅनलवर तात्काळ माहिती द्यावी किंवा कोस्टल हेल्पलाइन नंबर १०९३ वर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक ती काळजी घेत असून, जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.




