
क्रांतीनगर येथे महालक्ष्मी महिला मंडळाची बैठक संपन्न
स्थानिक उमेदवार सौ. सरिता जितेंद्र (दादा) कदम यांच्या नावाला पाठिंबा..
रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ५ क्रांतीनगर येथे महालक्ष्मी महिला मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यात स्थानिक उमेदवार सौ. सरिता जितेंद्र (दादा) कदम यांच्या नावाला महिला मंडळाने पाठिंबा दिला आहे.
रत्नागिरी नगरपालिकेचा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत सुरू आहे. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून, आता इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळण्यासाठी लगीनघाई सुरू झाली आहे.
दरम्यान, नवीन प्रभाग रचनेनुसार यंदा प्रथमच प्रभाग क्रमांक ५ क्रांतिनगर या स्वतंत्र प्रभागाची निर्मिती केली आहे. या प्रभागातून निवडून येणारा उमेदवार हा स्थानिकच हवा अशी मागणी येथील मतदारांनी बैठकीत केली आहे. स्थानिक जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देण्याबरोबरच त्या उमेदवाराचा प्रत्येक मतदारांशी चांगला संपर्क हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. म्हणूनच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित या प्रभागातून सौ. सरिता कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
नुकतीच या संदर्भात क्रांतीनगर महालक्ष्मी महिला मंडळाची बैठक घेण्यात आली. यात महिलांनी सौ. सरिता कदम यांच्या नावाला दुजोरा देत त्यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला आहे.




