
आदर्श आचारसंहितेची तत्वे व मार्गदर्शनराज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत …
निवडणणुकीची आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू केली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपरिषद क्षेत्रात आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडावी व शांतता आणि सुव्यवस्था राखावी याकरिता आदर्श आचारसंहिता ही एक नियमावली आहे. एखाद्या निवडणूकीचे निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर झाल्याच्या तारखेपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु होते आणि ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असते.
आचारसंहितचे क्षेत्र-सार्वत्रिक निवडणुकीची आचारंसहिता संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू राहील. आचारसंहिता जरी निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रापुरती लागू होणार असली तरी त्या बाहेरील आजूबाजूच्या क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे मतदारांवर प्रभाव पडून निवडणूकीवर परिणार होवू शकेल असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
निवडणूक प्रचार-आचारसंहिता काळात केल्या जाणाऱ्या निवडणूक प्रचाराबाबतदेखील मार्गदर्शन करण्यात आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, विविध जाती, जमाती, धर्म, भाषा आदी मुद्दयांवर समाजात दुही माजेल अथवा तेढ निर्माण होईल अशी गोष्ट कोणत्याही पक्ष अथवा उमेदवाराने करु नये. अन्य राजकीय पक्षांवर टीका करतांना, ती त्यांची धोरणे आणि कार्यक्रम यापुरती मर्यादित असावी, वैयक्तिक आयुष्यातल्या बाबींवर टीका करु नये. निवडणूक प्रचारासाठी प्रार्थना स्थळांचा व्यासपीठ म्हणून वापर करता येत नाही. तसेच मते मिळवण्यासाठी जातीय भावनांना आवाहन केले जाऊ शकत नाही. मतदारांना लाच देणे, वस्तूंचे, पैशाचे, मद्याचे वाटप करणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ 100 मीटर परिसरात प्रचार करणे या बाबी कारवाईस पात्र आहेत.
जाहीर प्रचाराचा कालावधी- मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचार बंद होईल. उदा. 10 तारखेस मतदान सुरु होत असल्यास 8 तारखेला रात्री 12 वाजता प्रचार बंद होईल. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यावर इलेक्टॉनिक व प्रिंट मिडीयाद्वारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत. मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रांमधून तसेच प्रसार माध्यमांद्वारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देण्यात येणार नाहीत.
इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे प्रचार- उमेदवारांनी जिल्हाधिकारी यांनी गठित केलेल्या समितीकडून प्रचार साहित्य तपासून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यावर इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे तसेच प्रिंट मिडीयाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील. यामध्ये मेसेजिंग ॲप तसेच व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटर यांचा समावेश आहे. निवडणूक कालावधीत इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा गैरवापर केल्यास, इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसिध्द केल्यास सायबर गुन्ह्यांचा (बंदी, प्रतिबंध इ.) कायदा 2015 अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार तसेच संबंधित इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.
सार्वजनिक सणांमधील आचरण- निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत विविध धर्मियांचे सण येतात. या सणांमध्ये कोणत्याही राजकीय /उमदेवाराचा सत्कार आयोजित करण्यात येवू नये. सण/उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्याने/उमेदवाराने कोणत्याही वस्तूचे वाटप करु नये. अथवा त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेवू नये. सण/उत्सव निमित्त लावण्यात आलेल्या पोस्टर्स, बॅनर्सवर उमदेवारांचा फोटो व नाव असून शकेल तथापि त्या बॅनर्स वर प्रचाराचा तसेच निवडणूक चिन्हाचा/पक्षाच्या नावाचा उल्लेख असू नये. आचारसंहिता कालावधीमध्ये भोजनावळ/जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करु नये.
- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




