
मराठी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सहकार्य : योगेश कदम
दापोली : मराठी भाषा आणि आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे व त्यांचा विकास साधणे ही शासनाची प्रमुख जबाबदारी असल्याचे मत यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.
कुंभवे येथील जिल्हा परिषद जीवन शिक्षण आदर्श शाळेचा अमृत महोत्सव आणि भूमिपूजन सोहळा गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे लोकार्पण तसेच नव्याने मंजूर झालेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
या शाळेची पटसंख्या वाढत असल्याचा आनंद व्यक्त करत गावातील नागरिक आणि शाळा प्रशासनाचे कौतुक केले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही ना. कदम यांनी उपस्थितांना दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीrत शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे शिक्षकच असतात, अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्यात तब्बल पंचाहत्तर वर्षांपूर्वा या शाळेत शिक्षण घेतलेल्या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा योगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, माजी जि.प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य सुनील दळवी, सरपंच लक्ष्मण झाडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरेश चोरगे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सांगडे, माजी सरपंच अनंत मांडवकर तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, ग्रामस्थ मंडळ कुंभवे आणि आजी-माजी विद्यार्था मोठ्या संख्येने उपस्थित होते.




