
कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट; सुरक्षेत वाढ
रत्नागिरी : राजधानी दिल्लीत झालेल्या भयंकर स्फोटाच्या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून समुद्रामार्गे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा घातपात घडू नये यासाठी कोकण किनारपट्टीवर तातडीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणात शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा २४ तास सज्ज आहे.
कोकणातील सागरी सुरक्षा व्यवस्थेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली असून, पोलीस आणि तटरक्षक दलाकडून समुद्रातील गस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. ५२५ लँडिंग पॉईंट्स संवेदनशील: मिळालेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवरील तब्बल ५२५ लँडिंग पॉईंट्स अत्यंत संवेदनशील (Sensitive) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.
समुद्रामार्गे होणारी घुसखोरी किंवा घातपाताची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किनारी सुरक्षेची कसून तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक आणि प्रशिक्षित श्वान पथकाची देखील मदत घेतली जात आहे. ही पथके संवेदनशील ठिकाणी आणि महत्त्वाच्या आस्थापनांभोवती तपासणी करत आहेत. केवळ सागरी मार्गच नाही, तर सागरी महामार्गावरून कोकणात ये-जा करणाऱ्या रस्त्यांवरही पोलिसांची ‘करडी नजर’ आहे. या मार्गांवर चेकपोस्ट उभारले असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ ताब्यात घेतले जात आहे.
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर, कोकणात शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. अधिकारी आणि जवान दिवसरात्र गस्त घालून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत.




