
राज्यातील २४२ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द! दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरण भोवले;
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी केसेस झाल्या, त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील २० केंद्रांसह राज्यभरातील २४२ केंद्रांचा त्यात समावेश आहे.बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्यभरात साधारणत: पाच हजारांवर केंद्रे असतात. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने मागील दोन वर्षांत खूप मोठे बदल केले आहेत. विद्यार्थी व पर्यवेक्षकांसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली. तरीदेखील, कॉपी केसेस अपेक्षेप्रमाणे कमी झाल्या नाहीत. आता बोर्डाने एक पाऊल पुढे टाकत तशा केंद्रांची मान्यताच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे पाच तर बारावीची १५ परीक्षा केंद्रे आहेत. दरम्यान, आगामी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, बुधवार व गुरुवारी सर्व जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना विद्यमान परीक्षा केंद्रांची तपासणी करायला सांगितले आहे.
प्रत्येक केंद्रांवरील सीसीटीव्ही, पक्की इमारत, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, पक्के वॉल कंपाउंड असल्याचे फोटो (लोकेशनसह) पाठवावेत, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. तर १५ नोव्हेंबरपासून नवीन परीक्षा केंद्रांची तपासणी होणार आहे. त्यानंतर १० डिसेंबरपूर्वी बोर्डाचे अध्यक्ष, सचिव व सर्व विभागीय अध्यक्षांची बैठक होईल. त्यानुसार परीक्षा केंद्रांची निश्चिती होणार असल्याचे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.




