
आमदार भास्कर जाधव व माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या न झालेल्या भेटीची दापोलीत चर्चा
दापोली : आपल्या पक्षाच्या बैठकीसाठी आलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी बैठकीनंतर आपला मोर्चा आपले जुने स्नेही दापोलीचे माजी आमदार व भाजपाचे नेते सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानी वळवल्याने दापोलीची राजकीय गणिते आगामी निवडणुकीत बदलतात का, याचीच चर्चा दिवसभर दापोलीत सुरू होती. माजी आमदार दळवी महायुतीच्या बैठकीसाठी चिपळूणला गेल्याने दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही; मात्र या भेटीचे “गॉसिप” दापोलीभर सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकेकाळचे सहकारी असणारे आमदार भास्कर जाधव व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे स्नेहबंध मजबूत आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी हे विधानसभा भवनामध्ये सर्वांजवळ मैत्रीचे संबंध ठेवून आहेत. विरोधी पक्षातही त्यांना मानाचे स्थान आहे. अनेकवेळा विद्यमान आमदार, माजी आमदार, मंत्री, खासदार हे दापोली दौऱ्यावर आल्यावर ते दळवी यांची अवश्य भेट घेतात. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपलेले व्यक्तीमत्व म्हणून दळवी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
दापोली शहरामध्ये ठाकरे सेनेची बैठक नर्सरी रोडवरील पेन्शनर्स सभागृह येथे आमदार जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत दोन पक्ष वगळता कोणाजवळही चर्चा करू नका, असा सल्ला जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र हा सल्ला दिल्यानंतर सभागृहाबाहेर पडलेल्या आमदार जाधव यांनी आपला मोर्चा वळवला तो आपले एकेकाळचे सहकारी असलेले व सध्या भाजपात सक्रिय असलेले माजी आमदार दळवी यांच्या निवासस्थानाकडे; मात्र ते मात्र चिपळूणला महायुतीची बैठक असल्याने उपलब्ध झाले नाहीत. या न झालेल्या भेटीची चर्चा मात्र दापोलीत दिवसभर सुरू होती.
याबाबत दळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. दापोलीत आल्यानंतर विविध राजकीय नेते मंडळी आपल्याला भेटतात. कधी मी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलो तर मी त्यांना भेटतो ही संस्कृती महाराष्ट्रातील राजकारण्यांची आहे. त्यात वेगळे काही नाही. आता मी भाजपामध्ये सक्रिय आहे ते त्यांच्या पक्षात सक्रिय आहेत. आम्ही दोघे आमच्या पक्षाचे काम निष्ठापूर्वक करत असून यामध्ये वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे सांगितले.




