
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमनियोजनाबाबत बैठक संपन्न
रत्नागिरी, दि. 11 ):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम नियोजनाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, एस.टी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, कोकण रेल्वेचे क्षे.रे.प्रबंधक शैलेश बापट, समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पवार, बुध्दिष्ट से.अ.कर्मचारी महासंघाचे सचिव शरद कांबळे आदी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सोईसुविधा देणे, फुलांची सजावट, रोषणाई, स्वच्छता करणे, मंडप घालणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदींबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. रेल्वेस्टेशन व बसस्थानक येथे अनुयायांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या.




