
आक्राळ-विक्राळ भूताने पत्नीला उचलून नेऊन खून केला असा बनाव रचून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा
राजापूर तालुक्यातील परुळे-सुतारवाडी येथील जंगलमय भागात एका आक्राळ-विक्राळ भूताने पत्नीला उचलून नेऊन खून केला असल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.खुनाची ही घटना 25 जून 2021 साली घडली होती.गजानन जगन्नाथ भोवड (४५, रा. परुळे, सुतारवाडी, ता. राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. गजानन भोवड व त्याची पत्नी सिद्धी उर्फ विद्या गजानन भोवड हे कुटुंब २०१९ कोविडच्या काळात परुळे येथील आपल्या गावी आले होते. मात्र पत्नी सिद्धी ही आरोपीला वेळेवर जेवण न देणे, मुलांकडे व्यवस्थित लक्ष न देणे तसेच त्याला आई-वडिलांवरुन शिवीगाळ करत होती. तसेच आरोपीचे अन्य स्त्रीयांबरोबर संबंध आहेत यावर दोघांमध्ये भांडण होत असे. हा राग मनात धरून आरोपीने २५ जून 2021 रोजी दुपारी पत्नी-सिद्धीला मी आज तुला तुझ्या बहिणीकडे नेतो असे सांगून तिला परुळे-सुतारवाडी येथील जंगलमय-दलदलीच्या भागात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिचे नाक व तोंड दाबून तिला जीवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह तेथील गवतात उपडे स्थितीत लपवून बायकोला भूताने मारले. असे गावातील ग्रामस्थांना सांगितले, ग्रामस्थांनी तिचा शोध घेतला अशी खोटी खबर आरोपी गजानन भोवड ने राजापूर पोलिस ठाण्यात दिली.
या घटनेचा तपास राजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मौळे करत होते. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला तपासात पोलिसांना आरोपीने केलेला बनाव उघड झाला. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादवी कलम ३०२, २०१, १७७ अन्वेय गुन्हा दाखल करुन अटक केली. तपासअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सोमवार 10 नोव्हेंबर रोजी खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ऍड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले या खटल्यात त्यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यापैकी आरोपीची बहिण, मेहुणा, संरपंच हे महत्वाचे साक्षीदार फितूर झाले.
मात्र केवळ परिस्थितीजन्य पुराव्यात डॉ. अजित पाटील, डॉ. विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे, मयत सिद्धी यांची बहिण-सोनाली शिंदे यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला या खटल्यात दोषी धरुन भादवी कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, भादवी कलम २०१ पुरावा नष्ट करणे यामध्ये ३ वर्षे कारावास १ हजार रुपये दंड, तसेच भादवी कलम १७७ खोटी खबर देणे यामध्ये पाचशे रुपये दंड १५ दिवस साधा कारावास तसेच यातील दंडाच्या रक्कमेतील ५ हजार मयत सिद्धीच्या आईला देण्यात येतील असा आदेश दिला. या खटल्यात तपासिक अमंलदार म्हणून राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर व पैरवी म्हणून पोलिस शिपाई विकास खांदारे यांनी काम पाहिले.




