
मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार -विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, रणनीती आखण्याचे काम गतीने सुरू आहे.याच दरम्यान महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा रंगत आहे. कारण मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, की आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ.
दरम्यान, मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.




