
लांजा तालुक्यातील निवसर मळेवाडी येथे एकाच रात्री दोन घरे फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेवर डल्ला मारला
लांजा तालुक्यातील निवसर मळेवाडी येथे एकाच रात्री दोन घरे फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने दरवाज्यांचे कुलूप आणि कपाटाचे लॉकर तोडून एकूण चव्वेचाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या दुहेरी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही चोरीची घटना दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.३० वाजेपर्यंतच्या दरम्यान, निवसर मळेवाडी, ता. लांजा या ठिकाणी घडली.राजेंद्र केशव शिंदे (वय ३७, रा. निवसर कानसरे मळेवाडी, ता. लांजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने राजेंद्र शिंदे यांच्या घराला लागून असलेल्या दोन घरांना लक्ष्य केले.
चोरट्याने महादेव सदू शिंदे यांच्या घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकर तोडून त्यातील ४,०००/- रुपये रोख रक्कम चोरून नेली. त्याचप्रमाणे, दुसऱ्या घरात शंकर शांताराम शिंदे यांच्या घराचेही कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकर फोडले आणि त्यातील ४०,०००/- रुपये रोख रक्कम लंपास केली. अशा प्रकारे दोन्ही घरांतून चोरट्याने एकूण ४४,०००/- रु. किंमतीची रोख रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली.




