
मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने, पै. चंद्रहार पाटील आयोजित देशातील पहिले ‘श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत’ आणि ‘शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन

तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने तसेच ‘डबल महाराष्ट्र केसरी’ पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वतीने आयोजित देशातील पहिले ‘श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत’ आणि ‘शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन’ आज शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले. त्यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
देशभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.
मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“ही केवळ बैलगाडा शर्यत नसून गोमातेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव आहे. गोमातेला ‘राज्यमातेचा दर्जा’ देऊन महायुती सरकारने परंपरा आणि श्रद्धेचा मान राखला आहे.”
या शर्यतीतून ग्रामीण भागात १०० कोटींहून अधिकची आर्थिक उलाढाल झाली असून, भविष्यात ही स्पर्धा ‘प्रो-कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो-बैलगाडा’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे.
या शर्यतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला स्पर्धकांचा सहभाग आणि गौरव. शर्यतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते १०० भगिनींना गाईंचे वाटप करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
विजेत्यांना थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि १५० टू-व्हीलर अशा अनेक सन्मानचिन्हांद्वारे विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, माजी आमदार शहाजी बापू पाटील,
तसेच बैलगाडा मालक, चालक, शर्यत प्रेमी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




