
उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी, आ. भास्कर जाधव यांची माहिती
उबाठा शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख जितेंद्र तथा पप्या चव्हाण यांची शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
आ. जाधव म्हणाले की, गुहागर मतदार संघात चिपळूण तालुक्यातील ७२ गावांचा समावेश असून या गावांचे तालुका प्रमुख म्हणून जितेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेली काही दिवस त्यांच्याकडून वारंवार पक्षविरोधी कारवाया सुरु होत्या. विरोधी पक्षाशी हातमिळवणी बैठका ही त्यांची कायमची सवय असून वारंवार त्यांना समज देऊन देखिल त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. ही बाब आपण पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविली असून त्यांच्या आदेशानुसार आपण चव्हाण यांची तालुकाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे. ७२ गावांतील कार्यकर्त्यांचा विरोध असताना देखिल आपण जुना सहकारी म्हणून प्रेमापोटी चव्हाण यांच्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्यावर विश्वास दाखविला. मात्र त्यांनी आपला विश्वासघात केल्याचे आ. जाधव यांनी सांगितले.www.konkantoday.com




