
कोकण रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या या रो-रो सेवेच्या माध्यमातून गतवर्षभरात तब्बल 10 हजार 860 मालट्रक्सची वाहतूक
कोकण रेल्वे मार्गावर रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानक ते गोवा राज्यातील वेर्णा व कर्नाटक राज्यातील सुरखकल दरम्यानच्या कोकण रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या या रो-रो सेवेच्या माध्यमातून गतवर्षभरात तब्बल 10 हजार 860 मालट्रक्सची वाहतूक करण्यात आली असून ही आर्थिक उलाढाल 27 कोटी रुपयांची झाली आहे.दरम्यान 5 नोव्हेंबर पासून या रो-रो सेवेच्या वॅगन्सची मालवाहतूक क्षमता वाढवण्यात येत असल्याने आता मालवाहतूकीत वाढ होणार असल्याची माहिती मुख्य जनसम्पर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी दिली आहे.
जानेवारी 1999 मध्ये सुरू करण्यात आलेली कोकण रेल्वेची रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) सेवा ही एक अद्वितीय आणि किफायतशीर मालवाहतूक सेवा ठरली आहे. लोडेड ट्रक थेट रेल्वे वॅगनवर वाहून नेण्यात येत असल्याने टॅक इंधनाची मोठी बचत, कार्बन उत्सर्जनात मोठी घट, महामार्गांवरील मालवाहू अवजड श्रेणीतील ट्रक्सची गर्दी कमी करण्यात यश आणि ट्रक चालकांचा थकवा दूर करण्यात मोठे यश साध्य करण्यात आले आहे.




