
गो-सेवेचा वसा घेतलेल्या सौ. श्रद्धा तेंडुलकर यांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने सन्मान
रत्नागिरी : गो-सेवेचा वसा घेतलेल्या व नि:स्वार्थीपणे हे कार्य अविरतपणे सुरू ठेवणाऱ्या सौ. श्रद्धा तेंडुलकर यांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी यांचा वतीने गो-सेवेच्या कार्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. औचित्य होते ते त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव या कार्यक्रमाचे.
गोरक्षणाचे कार्य म्हणून उत्साहीपणे सहभागी झालेले सर्वजण सातत्य ठेवण्यात नेहमीच अपयशी ठरतात. पण यामध्ये सौ. श्रद्धा यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
रत्नागिरी नगरपालिकेच्या उद्यमनगर येथील गोशाळेत अपघातातील जखमी गुरांचे वेळी-अवेळी ड्रेसिंग करणे, अनाथ वासरांना मांडीवर घेऊन बाटलीने दुध पाजणे, हाड मोडलेल्या गुरांची मालिश करणे, वेळेत चारा-पाणी घालणे, सर्व गाई-गुरांची अगदी आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेणे ते ही विना मोबदला, ही सेवा त्या निस्वार्थीपणे बजावत आहेत.
हिंदु धर्मात गाईला पवित्र स्थान आहे. गाईला मातेसमान समजले जाते. त्यामुळे गोवंश हा जपला गेलाच पाहिजे. त्यासाठी सर्वांनी या कार्यात सहभागी झाले पाहिजे. आपल्या परीने शारीरिक व आर्थिक योगदान दिले पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले.
गोरक्षणाचे कार्य केवळ कसायांच्या गाड्या पकडणे, वसुबारसचे कार्यक्रम करणे, गोसेवेच्या नावे निधी संकलन करणे इथपर्यंत मर्यादीत न राहता खरोखरच जखमी गाई-गुरांची सेवा नियमित सेवा होणे गरजेचे आहे. त्यांना दैनंदिन चारा-पाणी नियमित मिळणे गरजेचे आहे, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




