
क्रांतिनगरमधून (रत्नागिरी) सौ. सरिता कदम यांच्या नावाला मतदारांचा वाढता पाठिंबा
रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ५ क्रांतीनगर येथून स्थानिक उमेदवार सौ. सरिता जितेंद्र (दादा) कदम यांच्या नावाला मतदारांनी १०० टक्के समर्थन दिले असून, काल (७ नोव्हेंबर) या संदर्भात चर्चा करण्यासाठी क्रांतिनगर येथे बैठकीचे आयोजन केले होते.
गेली तीन वर्ष आतुरता असलेल्या नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठीची आदर्श आचारसंहिताही सुरू झाली आहे. अनेक प्रभागातून उमेदवारांनी तयारी सुरू केली असून, प्रत्यक्ष मतदारांना भेटण्यावर भर देत आहेत. काही उमेदवारांनी गेली चार-पाच वर्षे आपापल्या प्रभागात विविध उपक्रम राबवत, तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातून आपल्यालाच पक्षाकडून तिकीट मिळायला हवे, अशी अपेक्षा बाळगून आहेत.
दरम्यान, नवीन प्रभाग रचनेनुसार यंदा प्रथमच प्रभाग क्रमांक ५ क्रांतिनगर या स्वतंत्र प्रभागाची निर्मिती केली आहे. या प्रभागातून निवडून येणारा उमेदवार हा स्थानिकच हवा अशी मागणी येथील मतदारांनी बैठकीत केली आहे. स्थानिक जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देण्याबरोबरच त्या उमेदवाराचा प्रत्येक मतदारांशी चांगला संपर्क हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. म्हणूनच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित या प्रभागातून सौ. सरिता कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, येथील मतदारांनीही सरिता कदम यांच्या नावाला १०० टक्के पाठिंबा दर्शविला आहे.
या बैठकीला क्रांतिनगर येथील श्रीपाद सावंत, नागेश चिकोडीकर, मौलवी नदाफ, परशुराम धोत्रे, आकाश काटे, जहीर शेख, रामू धोत्रे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, सरिता कदम या शिंदे शिवसेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून, तशी उमेदवारीची मागणीही करण्यात आल्याचे समजते.




