
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे
राजापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांचे आवाहन
राजापूर : नगरपालिका निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी केले आहे.
राजापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता व कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) राजापूर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी सर्व राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या या बैठकीत गंबरे यांसह राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, निवासी नायब तहसीलदार विलास सरफरे, राजापूर पालिकेचे कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी गंबरे यांनी या नगरपालिका निवडणुकीच्या एकूणच कार्यक्रमाबाबत व नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना व माहितीचे वाचन करून याबाबत सर्व राजकीय पक्षांना माहिती दिली. तसेच उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक लागणारी माहिती, घ्यावयाची खबरदारी, निवडणूक खर्च, सुचक, आरक्षित प्रभागांतील उमेदवारांना आवश्यक असणारी कागदपत्रे, खर्चाची मर्यादा, प्रचारसभा व परवानग्या याबाबत माहिती दिली.
या निवडणूक कालावधीत सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन केले.
निवडणुकीच्या एकूणच कार्यक्रम व पद्धतीबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले जाणार असून या कक्षांतून आवश्यक ती माहिती, परवानग्या दिल्या जातील असेही गंबरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.




