गोगटे जोगळेकर महाविद्यालयात केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे ''खगोल पर्यटन प्रमाणपत्र अभ्यासक्रम" या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात विशेषतः नोव्हेंबर-फेब्रुवारी आणि एप्रिल-मे महिन्यात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'खगोल पर्यटन' ही एक अनोखी संधी आहे.
कोकणातील निसर्गरम्य स्थळे आणि अंधारे आकाश यासाठी अत्यंत पूरक आहे. पर्यटनसंबंधित खगोलशास्त्र यांची वाढती आवड लक्षात घेऊन स्थानिकांसाठी हा 'खगोल पर्यटन प्रमाणपत्र अभ्यासक्रम' महाविद्यालयाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
सदर अभ्यासक्रम 30 तासांचा असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाद्वारे इच्छुकांना खगोलशास्त्राचे मूलभूत ज्ञान, दुर्बिण हाताळण्याचे व्यावहारिक कौशल्य, रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करण्याचे तंत्र आणि विविध वयोगटांना माहिती देण्याचे कौशल्य शिकवण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणातून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी येथील खगोलप्रेमी विद्यार्थ्यानी या अभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. बाबासाहेब सुतार, भ्रमणध्वनी 7738458185 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.