सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमसुनीताबाई – पु. ल. सेवाव्रती पुरस्कार: चिपळूणच्या ‘सांजसोबत’ला

राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन प्रयोजिटं आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमात चिपळूणच्या ‘सांजसोबत’ या संस्थेला ‘सुनीताबाई–पु. ल. सेवाव्रती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. सुनीताबाई आणि पु. ल. यांनी लाखोंच्या देणग्या देऊन खूप साऱ्या संस्थांना उभं राहण्यासाठी मोठ सहकार्य केलं. त्यांच्या आर्थिक पुढाकाराने उभ्या राहिलेल्या मुक्तांगणसारख्या संस्था आज समाजाच्या आधारवड आहेत. या व्यतिरिक्त आधीपासून अस्तित्त्वात असणाऱ्या आयुका आनंदवनसारख्या संस्थांचे हात त्यांनी अधिक बळकट केले. त्यांच्या या दातृत्वाला सलाम म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
सांजसोबत ही संस्था ‘देश माझा मी देशाचा – देशाची समस्या माझी समस्या – मीच सोडवणार’ या त्रिसूत्री वर काम करते. समाजमाध्यमावरूनवरून वेगवेगळ्या कट्टर , सौम्य , तटस्थ विचारसरणीचे , पक्षाचे , मानसिकतेचे लोक एकत्र आले आणि त्यांनी वरील त्रिसूत्रीवर काम सुरु केले व त्यातून सांजसोबत ही संघटना निर्माण झाली
कोकणात खूप आडगावात वृद्ध, निराधार लोकांची संख्या प्रचंड आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या वृद्धांना मूलभूत गरजा भागणही अनेकदा अशक्य होतं. सरकारी मदत पुरत नाही आणि वयपरत्वे मोल-मजुरीची कामही मिळत नाहीत. अशावेळी त्यांच्या पाठीशी सांजसोबत उभी राहते. या मूलभूत गरजांसाठी मदतीचा हात देते. शारीरिक असमर्थता आणि गरिबी या दोन्हींनी हतबल असलेल्या वृद्धांसाठी सांज सोबत काम करते. आजवर सांज सोबत ने ८० वृद्ध दत्तक घेतले आहेत.
समाजमाध्यमातून त्यांचे सध्या 250 सभासद आहेत. प्रत्येक सभासद दर महिन्याला अगदी 100 रुपयांपासून जमेल तेवढी रक्कम जमा करतात. आलेल्या रकमेतून आवश्यक किराणा सामान या मंडळींना घरपोच केले जाते.
सांजसोबत या छताखाली ही मंडळी आयुष्याच्या संध्याकाळाकडे झुकलेल्या आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमध्ये हात देऊन त्यांची संध्याकाळ सुलभ करत आहेत.
तसेच महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीतसुद्धा सांजसोबतने मराठवाडा परिसरात 3000 पूरग्रस्तांपर्यंत धान्य, औषधे आणि अत्यावश्यक सेवा पुरवल्या. शेकडो व्यावसायिकांना थेट मदतीचा हात दिला.
सांजसोबतचे हात बळकट करण्यासाठी संस्थेचा खारीचा वाटा म्हणजे सुनीताबाई -पु. ल. सेवाव्रती पुरस्कार! 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमात सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button