
सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी वर्ष उपक्रमाचा रत्नागिरीत शुभारंभ

रत्नागिरी : प्रख्यात लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन प्रायोजित आणि आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी वर्ष उपक्रमाचा शुभारंभ आज रत्नागिरीत करण्यात आला.
आज (७ नोव्हेंबर) सकाळी पटवर्धन हायस्कूलच्या कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृहात अभिनेत्री शुभांगी दामले, लेखिका नीता कुलकर्णी, दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या हस्ते अभिवाचन स्पर्धेचे उद्घाटन झाले. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात होणारी ही स्पर्धा दिवसभर चालली. बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर आणि आरती प्रभू यांच्या कविता काव्य अभिवाचन स्पर्धेत, तर सुनीताबाई लिखित पुस्तकांमधील आशय गद्य अभिवाचन स्पर्धेत स्पर्धकांनी केले. स्पर्धा संपल्यानंतर शुभांगी दामले यांनी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले. हा कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलमध्ये झाला.
दरम्यान, “आहे मनोहर तरी” या गाजलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ करणारे चित्रकार बाळ ठाकूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत जवळपास तीनशे पुस्तकांच्या मुखपृष्ठांची चित्रे आपल्या कुंचल्यातून साकारली. नाट्यगृहात त्या सर्व पुस्तकांचे व रेखाचित्रांचे प्रदर्शन तीनही दिवस पाहण्यासाठी खुले राहील. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्या हस्ते करण्यात आले
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात हे तीनही दिवस साहित्यप्रेमींसाठी छोटेखानी पुस्तक प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे.




