
काजूच्या भुशाची पशुखाद्य म्हणून आयात होत असल्याने काजू उद्योगाला मोठा फटका
आयात कर चुकविण्यासाठी काजूचे बारीक तुकडे आणि काजूचा भुसा हे पशुखाद्य नावाखाली आयात केले जातात. यामुळे काजू उद्योगांना मोठा फटका बसत आहे. यावर सरकारने कारवाई करायला हवी अशी मागणी आंध्रप्रदेश राज्य काजू उत्पादक संघटनेने केंद्राकडे केली आहे. त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील उत्पादकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
देशभरातील वेगवेगळ्या आयात केंद्रांमध्ये काजू आयात केला जातो. गेल्या पाच वर्षात विशेषतः काकीनाडा, चेन्नई, मुंबई, विशाखापट्टणम आणि इतर बंदरात काजू बीची बेकायदेशीर आयात होत आहे. आयातीमुळे काजू उद्योगांवर गंभीर परिणाम होत आहे. काजू बीचे अगदी बारीक तुकडे आणि बीचा भुसा आयात केला जातो. त्यावर पशुखाद्य असे लिहिलेले असते. वास्तविक हा माल काजू मिठाई व अन्य खाद्यपदार्थांत वापरला जातो. यामुळे काजूच्या बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे. परदेशातील काजूचे अगदी बारीक तुकडे स्वस्त दरात मिळतात. त्यावर पशुखाद्यासाठी कमी आयातशुल्क लावले जाते. त्यामुळे आयातदार स्वस्तात काजू तुकड्यांची आयात करतात.
देशात विशिष्ट बंदरामध्ये अशा काजूची आयात झाली तरी एकदा बाजारात पोहोचल्यावर देशातील काजूच्या किंमतीवर होतो. आंध्रप्रदेश काजू उत्पादक संघटनेने याविरूद्ध केंद्र सरकारला कारवाई करण्यासाठी आवाहन केले आहे. चुकीच्या आयात कोड अंतर्गत कारवाई व्हावी असे त्यांचे म्हणणे आहे.www.konkantoday.com




