
पावसामुळे भाताला पुन्हा फुटू लागले अंकुर
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे येथील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली भातशेती सलग पावसामुळे वेळीच कापता न आल्याने जमीनदोस्त झाली आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले भातपीक हिरावल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भात पिकाच्या नुकसानीबरोबरच जनावरांच्या वैरणाचा प्रश्नही उभा ठाकला आहे.
भात कापणीनंतर पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या वैरणीसाठी केला जातो. मात्र पीक शेतात कोसळून भिजल्यामुळे ही वैरणही खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्यामुळे भविष्यात जनावरांसाठी वैरणीचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर भात कापणीचे काम शिल्लक आहे. सततच्या पावसामुळे या कामात मोठ्या अडचणी येत आहेत. उभे पीक पावसामुळे शेतातच कोसळल्याने ते कुजून जाण्याची भीती आहे. इतकेच नव्हे तर तयार भाताच्या लोंब्यांना ओलाव्यामुळे पुन्हा अंकुर फुटू लागले आहेत. ज्यामुळे पिकांच्या गुणवत्ता व उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शेतकर्यांच्या झालेल्या या नुकसानीकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटलाजात असल्याने शासनाने तत्काळ मदत करण्याची भावना व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




