
बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम आजपासून कोकण दौऱ्यावर
बळीराज सेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांचा कोकण दौरा आजपासून (३ नोव्हेंबर) सुरू होत आहे. या दौऱ्यादरम्यान, कोकणातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेती नुकसानाची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे आणि ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
कोकणात गेले पाच महिने पाऊस पडत असून, कोकणातील शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. या वाढीव पावसात भात शेती, नाचणी, कुळीथ, उडीद अशी कोकणातील इतरही पिकांचे फार नुकसान झाले आहे. तसेच आंबा, काजूचा हंगाम ही दीड महिना लांबला आहे.
हे सरकार व कोकणातील आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री यांना अजिबात कोकणातील शेतकऱ्यांबाबत कुठलीच काळजी नसल्याचे दिसत आहे. म्हणूनच या दौऱ्यादरम्याने कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचीही तयारी करण्यात आल्याची माहिती अशोक वालम यांनी दिली.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अंदाज घेऊन कोकणात कुठे कुठे आपल्याला उमेदवार उभे करून लढता येईल याचीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चाचपणी करण्यासाठी हा रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर असा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात कोकणातील पाचही जिल्ह्यातील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पदाधिकाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी ते स्वतः बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.



