
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे तिसरे पर्व यशस्वी
मुलांच्या गटात साईराज, शमिका अव्वल, तर पुरुष गटात हर्षल, डर्विन, आस्ताद, महिलांच्या गटात प्रीती, योगेश्वरी आणि किरण प्रथम


रत्नागिरी : चढ-उतारांचे घाट व सपाट रस्त्यांवर जवळपास ५० किमीच्या मार्गावर सायकलवरचा थरार रविवारी रत्नागिरीकरांनी अनुभवला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेकमध्ये रविवारी सकाळी तीन तास भाट्ये-गावखडी व परत भाट्ये या मार्गावर ही देशपातळीवरील सायकल स्पर्धा संपन्न झाली. काल (२ नोव्हेंबर) मोंथा चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस असूनही देशभरातील सव्वादोनशे सायकलपट्टूंनी स्पर्धेत भाग घेतला व आज सुदैवाने पावसाने विश्रांती घेऊन मोठा दिलासा दिला.

स्पर्धेत मुलांच्या गटात साईराज भोईटे, मुलींच्या गटात शमिका खानविलकर यांनी अव्वल स्थान पटकावले. तर पुरुषांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये हर्षल खांडवे, डर्विन व्हिएगास, आस्ताद पालखीवाला यांनी आणि महिलांच्या विविध गटात प्रीती गुप्ता, योगेश्वरी कदम, किरण जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित या स्पर्धेचे हॉटेल विवेक पॉवर्ड बाय पार्टनर होते. तसेच सुवर्णसूर्य फाउंडेशन सहप्रायोजक होते. सकाळी साडेसहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन भाट्ये ग्रामस्थ तसेच बहुसंख्य सायकलप्रेमींच्या उपस्थितीत झाले.
“दिमाग से खेलेगा वही जितेगा” अशी या स्पर्धेची टॅगलाईन होती. भाट्याचा पहिला चढाव पार करून पुढे सपाट रस्ता, गोळपला उतार, पावस बायपास रोडची वळणे, चढ, नंतर तीव्र उतार, पुन्हा वळणावळणांचा चढणीचा रस्ता, गावखडीचा तीव्र उतार अशा रस्त्यावरून स्पर्धक सुस्साट वेगाने जाताना पाहायला मिळाले. मार्गावर नवलाई नादब्रह्म ढोल पथकाने ढोल-ताशे वाजवून व रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्थानिक ग्रामस्थांनी स्पर्धकांचा जोश वाढवला.
बक्षीस वितरण कार्यक्रम हॉटेल विवेक येथे झाला. या वेळी प्रमुख पाहुणे टिलेज ॲग्रोचे मालक धनंजय डबले, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, हॉटेल विवेकचे सार्थक देसाई, ॲड प्लसचे मंगेश सोनार, प्रवीण पाटील, सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संचालिका सौ. तेजा देवस्थळी आदी उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले.
बॉन अपेटाइटच्या माध्यमातून स्पर्धकांना न्यूट्रीशन देण्यात आले. इनर्झाल या उपक्रमाचे हायड्रेशन पार्टनर होते. ॲड प्लसने सर्व स्पर्धकांसाठी प्रीमियम वॉटर दिले. सॉर्जन या उपक्रमाचे कॉम्प्रेशन पार्टनर होते. दीपक पवार यांनी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली तर खेडशीचे माजी सरपंच निरंजन सुर्वे यांनी ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या.
११-१७ वयोगटात रत्नागिरी सायकलिस्ट क्लब संपूर्ण शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात करत असलेली सायकलिंग विषयक जनजागृती अनुभवायला मिळाली.
८ बक्षिसांपैकी ४ बक्षिसे रत्नागिरी मधील सायकलिंग करणाऱ्या मुलांनी पटकावली. मुलींमध्ये तीनही नंबर रत्नागिरी शहर परिसरातील मुलींचे आले. फणसोप हायस्कूल इथे वर्षाच्या सुरुवातीला घेतलेले सायकल वर्कशॉप तसेच सातत्याने सायकलिंग करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लब सदस्य यांमुळे लहान मुलांमध्ये सायकलिंग विषयी जनजागृती वाढल्याचे अनुभवायला मिळाले.
भाट्ये गावातील दिव्यांग सायकलपटू आराध्य कैलास भाटकर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या उपक्रमाने प्रभावित होऊन अशा उपक्रमात प्रथमच सहभागी झाला होता. त्याने देखील चढ उताराचे रस्ते असलेली ही स्पर्धा सुनिश्चित वेळेत पूर्ण केली. आराध्यचे विशेष कौतुक करण्यात आले आणि सर्व सहभागी सायकलप्रेमी आणि रत्नागिरीकरांनी टाळ्यांचा गजर करत उभे राहून आराध्यला मानवंदना दिली.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सौरभ रावणांग याने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या विशेष प्रयत्नाने मिळालेली नवी सायकल वापरून हे अंतर १ तास ३२ मिनिटात पार केले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे डॉ. नितीन सनगर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली त्याने यासाठी मेहनत केली. हीच सायकल वापरून रुद्र दर्शन जाधव याने देखील विभाग स्तरावर धडक मारली आणि पालक मंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवला. रुद्रच्या यशामागे देखील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मोलाचा वाटा आहे.
आरडीसीसी बॅंक, जय हनुमान मित्रमंडळ, ग्रामपंचायतींनी मनुष्यबळ दिले तसेच हायड्रेशन पॉईंटची व्यवस्थाही केली. वाहतूक पोलिसांचे उत्तम सहकार्य लाभले. जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.
गटनिहाय विजेत्यांची नावे
११ ते १७ वर्षे मुलांचा गट (२५ किमी)- साईराज भोईटे (सातारा, वेळ ३५ मिनिटे), रुद्र चव्हाण (मुंबई), परिक्षित परब (मुंबई), रुद्र जाधव (रत्नागिरी), आयुष चव्हाण (मुंबई). मुलींचा गट- शमिका खानविलकर (रत्नागिरी, वेळ ४९:१४), आराध्या चाळके (रत्नागिरी), धनश्री कुडकेकर (रत्नागिरी).
मास्टर्स (५० किमी, पुरुष गट)- हर्षल खांडवे (नाशिक, वेळ १:३२:४९), प्रसाद आलेकर (चिपळूण), किरण पवार (मुंबई), संतोष बाबर (उंब्रज), रोहन कोळी (मुंबई), अभिजित पड्याळ (रत्नागिरी), चंद्रकांत मोरे (सातारा), समीर नाडकर्णी आणि फ्रान्सिस रॉड्रिग्ज (दोघेही गोवा).
एलाईट पुरुष गट- डर्विन व्हिएगास (गोवा, १:२३:२८), यश थोरात (ठाणे), हनुमंत चोपडे (सांगली), तेजस धांडे (नागपूर), आयुष (दिल्ली).
मास्टर्स महिला गट- प्रीती गुप्ता (पुणे, वेळ १:५५:४७), कल्याणी तुळपुळे (दापोली), आदिती डम (नवी मुंबई).
एलाईट महिला गट- योगेश्वरी कदम (सांगली, वेळ १:४०:३१), सिद्धी दळवी (ठाणे).
ज्येष्ठ पुरुष गट- आस्ताद पालखीवाला (लोणावळा, वेळ १:३८:२६), प्रशांत तिडके आणि आदित्य पोंक्षे (दोघेही पुणे)
ज्येष्ठ महिला- किरण जाधव (मिरारोड, वेळ २:२५:३९), वर्षा येवले (कल्याण), सुजाता रंगराज (मुंबई).
आजच्या स्पर्धेत देशाच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंचा कस लागला. या खेळाडूंचा सरासरी वेग ताशी ५० होता व स्पर्धा जिंकण्यासाठी शेवटच्या एक किलोमीटरमध्ये हा वेग जवळपास ६० ते ७० च्या दरम्यान होता. या स्पर्धेत लाखो रुपयांच्या आणि जबरदस्त पळणाऱ्या, वजनाने कमी, कार्बन बॉडी असणाऱ्या सायकल्स पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळाली. भाट्ये, कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी ग्रामंपचायतींचे बहुमोल सहकार्य लाभले.
स्पर्धकांनी केले रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कौतुक
आस्ताद पालखीवाला म्हणाले की, गेल्या वर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या वेळेसच माझी सायकल पंक्चर झाली होती; परंतु या वर्षी मी भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमती किरण जाधव यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे व रूट सपोर्ट व्यवस्थापनाबद्दल कौतुक केले. हर्षल खांडवे याने यंदा प्रथमच भाग घेतला व पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेला आरसीसीने दिलेल्या पाठपुराव्यासाठी समाधान व्यक्त केले. प्रीती गुप्ता यांनी मी सलग तीन वर्षे येत आहे, गेल्या वर्षीच्या सूचनांवर आरसीसीने अंमलबजावणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सर्व महिलांना मंचावर आमंत्रित करून पदक दिल्याबद्दल कौतुक केले.




