
महावितरणची डिजिटल झेप, घरातूनच बदला विजबिलावरचे नाव, महावितरणची नवी सुविधा
वीजग्राहकांना अधिक दर्जेदार जलद आणि घरबसल्या सेवा देण्यासाठी महावितरणकडून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. वीज बिलावरील ग्राहक नाव बदल करण्याच्या ऑनलाईन अर्जांना आता स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरूवात करून व प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर ग्राहक नावातील बदलाची कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसात पूर्ण होणार आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तब्बल एक महिना लागत होता. राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार वीजग्राहकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महावितरणने ही नवकल्पना राबवली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी यास मंजुरी देत या प्रक्रियेसाठी नवीन ऑनलाईन प्रणाली विकसित करून कार्यान्वित केली आहे. ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाईल ऍप वरून लॉग इन करून अर्ज सादर करता येतो. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर व प्रक्रिया शुल्क भरल्यनंतर अर्जाची स्वयंचलित छाननी होईल. त्रुटी आढळल्यास ग्राहकाला लगेच एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, तसेच नाव बदल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची सूचना देखिल दिली जाईल. या उपक्रमामुळे विशेषतः घरगुती आणि लघु ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे
www.konkantoday.com




