
नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी लोटेतील आठ उद्योगांवर कारवाई होणार…
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाने ८ उद्योगांवरील कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाला पाठवला आहे. वारंवार सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकरण आता या वसाहतीतील उद्योगांना चांगलेच भोवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बुधवारी रात्री कोसळलेल्या पावसाचा गैरफायदा उठवत औद्योगिक वसाहतीतील काही उद्योगांनी आपले रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने नाल्यासह कोतवलीतील सोनपात्रा नदी लालेलाल पाण्याने वाहू लागली. गुरूवारी सकाळी हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र मच्छिमारांसह ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जावून नदी, नाल्यासह संशयित उद्योगांच्या भागातील पाण्याचे नमुने घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तर दोषी उद्योगांवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवारच्या घटनांमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली जावू लागली. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारात एका बलाढ्य उद्योगावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. असे असतानाच गुरूवारी उघडकीस आलेल्या घटनेप्रकरणी तब्बल ८ कारखान्यांना जबाबदार धरत त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांच्याकडे पाठवला आहे.www.konkantoday.com




