
महानिर्मितीचे राज्यभरातील १० वीज निर्मिती संच बंद. राज्यातील वीज पुरवठ्यावर…
नागपूर : राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. सोबतच काही संचात तांत्रिक बिघाडही झाला आहे. त्यामुळे महानिर्मितीचे राज्यातील २८ पैकी १० वीज निर्मिती संच बंद आहेत. राज्यात ढगाळी वातावरण संपल्यास विजेची मागणी अचानक वाढून वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत आणखी सविस्तर आपण जाणून घेऊ या.
राज्यात महानिर्मितीचे सात औष्णिक विद्युृत केंद्र असून तेथे २८ वीज निर्मिती संच आहेत. या सर्व केंद्रांची वीज निर्मिती क्षमता १०,२०० मेगावाॅट आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता येथील एकूण संचांपैकी १० संच बंद होते. भुसावळ आणि परळी केंद्रातील सर्वच वीज निर्मिती संच बंद आहेत. दरम्यान, राज्यात यावेळी विजेची मागणी १९ हजार ३५६ मेगावाॅट होती. त्यापैकी महानिर्मितीकडून केवळ ४,२४७ मेगावाॅट वीज निर्मिती केली जात होती. त्यामुळे राज्यात खुल्या बाजारातून वीज खरेदीची पाळी आल्याचे विद्युत क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राज्यात वीज निर्मिती कमी झाल्याने वीज पुरवठादार कंपन्यांना जादा दराने वीज खरेदी करावी लागत असून हा पैसा वीज ग्राहकांच्या खिशातूनच जाणार आहे. दुसरीकडे कमी वीज निर्मिती केल्याने विजेची मागणी-बाजू व्यवस्थापन आणि राज्य वीज नियामक आयोगाच्या मानकानुसार डिसअलाऊंस (परवानगी नाकारणे) स्वरूपात कंपनीवर तोटा सहन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. खापरखेडात वीज निर्मिती संच चालू असूनही केवळ ५० टक्के भारांकावरच वीज निर्मिती सुरू आहे. येथे १ हजार ३४० मेगावाॅट वीज निर्मिती क्षमता असतानाही केवळ ६७७ मेगावाॅटच वीज निर्मिती होत आहे.
महानिर्मितीचे म्हणणे काय?
राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने शून्य शेड्यूलनुसार महानिर्मितीचे सहा वीज निर्मिती संच बंद आहेत. चंद्रपूरचा युनिट क्रमांक ७ हा ५०० मेगावाॅटचा संच आणि भुसावळचा ६६० मेगावाॅटचा युनिट क्रमांक ६ हा संचही तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. परळीचा २५० मेगावाॅटचा संच क्रमांक ८ हा देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. नाशिकचा युनिट क्रमांक ५ मधील कोळसा इतर संचाकडे वळवल्याने तो बंद आहे. सध्या राज्य वीज नियामक आयोगाच्या निकषानुसार वीज निर्मिती सुरू असल्याने डिसअलाऊंस (परवानगी नाकारणे) स्वरूपात कंपनीला तोट्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी दिली.




