
जिल्हा परिषद शाळेत शिकूनही राज्यसेवेत राज्यात पहिला
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीपूत्र विजय लामकाने याची उपजिल्हाधिकारी पदावर निवड
सोलापूर :
अनेक पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून सेमी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. जि. प. शाळांच्या गुणवत्तेबाबत कायम ओरड केली जाते, मात्र या टीकेला सोलापूरच्या एका तरुणाने उपजिल्हाधिकारी बनून उत्तर दिले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेला हा विद्यार्थी राज्यसेवेच्या परीक्षेत राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विजय नागनाथ लामकाने असे या तरुणाचे नाव असून त्याने आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालानंतर 1 हजार 516 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. 30 ऑक्टोबरपर्यंत या मुलाखती घेऊन नुकताच हा निकाल जाहीर करण्यात आला.
जि. प. शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेतून पायाभरणी
सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभ्यासाचे धडे गिरवताना विजयला स्पर्धा परीक्षेचे बाळकडू मिळाले.
प्राथमिक शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्याने घवघवीत यश मिळवले. शालेय वयात 2013 साली झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत
त्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. शालेय शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम होतो, हे विजयने सिद्ध करून दाखवले आहे. शाळा कोणतीही असो, पण जिद्द, चिकाटी, सातत्य आणि परिश्रमाच्या जोरावर यश मिळवता येते हे या तरुणाने दाखवून दिले आहे. विजयचे माध्यमिक शिक्षण नागनाथ विद्यालय मोहोळ येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील ए. डी. आणि जोशी महाविद्यालयात झाले. ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याने पुणे गाठले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांचा सातत्याने व कसून अभ्यास केला.
शेतकरी कुटुंबाचा ‘विजय’
विजयचे वडील नागनाथ लामकाने हे शेती करतात. शेतकरी असूनही विजयच्या आईवडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत विजयने आपल्या यशाचा आलेख कायम उंचावत ठेवला.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना सन 2021 मध्ये विक्रीकर निरीक्षक या पदावर त्याची नियुक्ती झाली.
सन 2022 मध्ये दुय्यम निबंधक व मुद्रांक शुल्क अधिकारी या पदावर निवड झाली. सन 2023 मध्ये एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत गटविकास अधिकारी या पदावर निवड झाली. अभ्यास आणि जिद्द या जोरावर त्याने पुन्हा राज्यसेवा परीक्षा दिली.
सन 2024 मध्ये (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
शेतकऱ्याचा मुलगा राज्यात पहिला
ग्रामीण भागातील मराठी शाळेत शिकल्यानंतर पुण्यासारख्या शहरात जावून प्रतिकूल परिस्थितीतही त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या दुनियेत टिकण्यासाठी जिगर महत्त्वाची असते. अभ्यासात सातत्य ठेवावे लागते. अनेक पराभव पचवावे लागतात, तरच यशोशिखर गाठता येते, हे या शेतकऱ्याच्या मुलाने सिद्ध करून दाखवले आहे.




