
पावसाचा फायदा घेत लोटेतील कारखानदारांचा ‘रासायनिक खेळ’!
सोनपात्रा नदी लालेलाल, ग्रामस्थ व मच्छीमार संतप्त
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी बुधवारी रात्री झालेल्या पावसाचा गैरफायदा घेत आपल्या उद्योगांतील रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्यामुळे पुन्हा एकदा पर्यावरण प्रदूषणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी कोतवलीतील सोनपात्रा नदी लालेलाल पाण्याने वाहू लागली, तर परिसरात तीव्र रासायनिक वास पसरला. गुरुवारी सकाळी हा प्रकार ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या निदर्शनास येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली.
गेल्या महिनाभरात हा तिसऱ्यांदा घडलेला प्रकार असून, कारखानदार पावसाच्या सरींचा आडोसा घेत सांडपाणी नाल्यात सोडत आहेत. गेल्या आठवड्यातही मुसळधार पावसाच्या सरींनंतर लोटेतील नाल्यातून रासायनिक पाण्याचा प्रवाह दिसून आला होता. हा नाला सीईटीपीजवळून जात कोतवली गावातील सोनपात्रा नदीत मिसळतो आणि पुढे जगबुडी नदीमार्गे दाभोळखाडीत पोहोचतो. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसादरम्यान काही कारखानदारांनी पुन्हा गुपचूप सांडपाणी सोडल्याने नदीचे पाणी लाल झाले व त्यातून तीव्र दुर्गंधी पसरली.
या घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी शिंगारे, तसेच सीईटीपी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोनपात्रा नदी आणि नाल्यातील पाण्याचे नमुने घेतले तसेच संशयित आठ ते दहा उद्योगांची तपासणी केली.
या सर्व नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी सुरू असून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान,स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांच्या मते, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे कारखानदार निर्ढावले आहेत. सीईटीपीमार्फत प्रक्रिया करून सांडपा सुविधा असतानाही काही उद्योग थेट नाल्यात रासायनिक पाणी सोडत आहेत.
“दोषींवर टाळे लावले नाहीत, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा दाभोळखाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी दिला आहे.
आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्या कारखान्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडे पाठवला गेला असला, तरी प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. त्यामुळे उद्योग अधिक निर्भय होत चालले आहेत, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
यावेळी मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सांडपाणी नाल्यात सोडणारे हे सर्व कारखाने सीईटीपीचे सभासद आहेत. सीईटीपीमार्फत सांडपाण्याची प्रक्रिया करून ते एमआयडीसीच्या पाइपलाइनमधून करंबवणे खाडीत सोडले जाते, असा नियम असतानाही सभासद उद्योग बिनधास्तपणे नाल्यात सांडपाणी सोडत आहेत.
“प्रदूषण नियंत्रण मंडळ तर कारवाई करेल, पण सीईटीपी प्रशासनाने आपल्या सभासदांना जाब विचारणार का? दंड लावणार का?” असा थेट प्रश्न मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.




