आरोग्यमंत्री ‘ॲक्शन मोड’वर! खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई!


खासगी रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारी वाढत आहेत. या रुग्णालयांकडून नियमभंग झाल्यास भविष्यात कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी बॉम्बे नर्सिंग होम कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. आगामी अधिवेशनात याला मंजुरी घेतली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी दिली.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला गुरुवारी भेट दिली. या वेळी त्यांनी १०२, १०४ आणि १०८ रुग्णवाहिका सेवेच्या नियंत्रण कक्षाची पाहणी केली. या प्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तसेच, इतर काही खासगी रुग्णालयांच्या विरोधात आधी तक्रारी करण्यात आल्या होत्या. खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रार आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करता येत नव्हती. यापुढे अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करता यावी, यासाठी बॉम्बे नर्सिंग होम कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. आगामी अधिवेशनात याला मंजुरी घेतली जाईल.

खासगी रुग्णालयांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाईल. नियम हे सर्वांसाठी लागू असून, खासगी रुग्णालये त्याला अपवाद नाहीत. त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही; परंतु, त्यांच्यावर सरकारी यंत्रणांचा धाक असावा. त्यांच्याकडून नियमभंग झाल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करता यावी, अशा सुधारणाही कायद्यात करण्यात येणार आहेत, असे आबिटकर यांनी सांगितले.

जनआरोग्य योजना लागू करावीच लागेल

काही धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यास विरोध केला असून, याबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, की धर्मादाय म्हणून नोंदणी करताना ज्या रुग्णालयांनी शासनाकडून विविध सुविधा घेतलेल्या आहेत, त्यांना ही योजना लागू करावीच लागेल. मुख्यमंत्र्यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे. धर्मादाय रुग्णालयांना या योजनेचा स्वीकार करून रुग्णांना सेवा द्यावी लागेल. रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी सरकारी रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालयांवरही आहे.

हृदय, फुफ्फुसासह इतर प्रत्यारोपण यांसारख्य़ा शस्त्रक्रियांसाठी खूप खर्च येतो. हा खर्च आता आम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून देणार आहोत. ही योजना लागू असलेल्या रुग्णालयांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच रुग्णालयांना ही योजना स्वीकारावी लागेल. – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button