
मुंबईत ऑडिशनच्या नावाखाली २० मुलांना डांबून ठेवलं, आरोपीकडून स्टुडिओ पेटवण्याची धमकी!
- मुंबईतील पवई येथे एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. चांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीने १५ वर्षांखालील १७ मुलांना डांबून ठेवलं होतं. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पवई पोलीस, साकीनाका पोलीस व अग्निशमन दलाने या मुलांची सुटका केली आहे.
दिनेश गोसावी नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती देताना सांगितलं की “अभिनय कार्यशाळेच्या नावाखाली या मुलांना रॉ स्टुडिओत बोलावून आरोपीने त्यांना बंदिस्त केलं होतं. ही मुलं दुपारी कार्यशाळेतून बाहेर पडत होती. परंतु, आज ती बाहेर आली नाहीत, त्यामुळे त्यांचे पालक स्टुडियोजवळ जमले. त्याचवेळी काही मुलं स्टुडिओच्या काचेच्या खिडकीतून बाहेर डोकावण्याचा व मदत मागण्याचा प्रयत्न करताना दिसली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. आजूबाजूचे लोक जमले.”
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला एनओसी देणे म्हाडाला बंधनकारक ; विकासकाशी खासगी वाद अडथळा नाही , उच्च न्यायालयाचा निर्वाळा
नेमकं काय घडलं?
गोसावी म्हणाले, “स्थानिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर पवई पोलीस व साकीनाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र, आरोपीने त्याच्याकडे बंदूक व ज्वलनशील पदार्थ असून कोणीही आत येण्याचा, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर मी हा स्टुडिओ पेटवून देईन अशी धमकी दिली. त्यानंतर बराच वेळ पोलीस आरोपीला समजावून मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व मुलांना सुखपूर बाहेर काढलं असून पोलिसांनी आरोपी रोहित आर्य याला ताब्यात घेतलं आहे.
रोहित आर्यने मुलांना डांबून का ठेवलं होतं?
दरम्यान, रोहित आर्य हा मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्याने मुलाना डांबून ठेवलं होतं तेव्हा एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्याने म्हटलं होतं की “मला या मुलांना काहीच करायचं नाही. मात्र मला काही लोकांशी बोलाचं आहे, चर्चा करायची आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. मला कोणी रोखण्याचा, इथे येण्याचा प्रयत्न केला तर या मुलांबरोबर काही वाईट घडलं तर त्यास मी जबाबदार नसेन.”
रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून पोलीस रोहितला चौकशीसाठी घेऊन गेले आहेत.




