गुहागर किनार्‍यावरील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित


जिल्ह्यातील गुहागर व लाडघर समुद्रकिनार्‍याबरोबर राज्यातील आणखी ३ समुद्रकिनार्‍यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर आता मानांकनाची तयारी सुरू झाली आहे. यामधील राष्ट्रीय पर्ंयावरण विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात समुद्रकिनार्‍यांचे सुरक्षा ऑडिट सुरू झाले असून यात गुहागर समुद्रावरील ३०० मीटरचे क्षेत्र तर लाडघर समुद्रावरील ६४५ मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे पहिल्याच तपासणीमध्ये समोर आले आहे.
राज्य सरकारचा खासकरून कोकण विभागासाठी हा पहिलाच प्रयोग आहे. यामुळे निवड करण्यात आलेली गुहागर, लाडघर, श्रीवर्धन, नागाव व पर्णका (डहाणू) हे पाचही समुद्रकिनारे कोणत्याही परिस्थितीत ब्ल्यू फ्लॅग मानांकन करण्याचे धोरण
निश्चित करण्यात आले आहे. या मानांकनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय पर्यावरण विभागाच्यावतीने बिश्वजित देव यांनी गुहागर व लाडघर या दोन समुद्रकिनार्‍यांचे सुरक्षा ऑडिट केले. गुहागर समुद्रकिनारा हा ७ किलोमीटर लांब आहे. मात्र ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी ६०० मीटरचे क्षेत्र विकसित केले जाणार आहे. बिश्वजित देव यांनी संपूर्ण समुद्र किनार्‍याची पाहणी केली. यामध्ये गुहागर पोलीस परेड मैदानाच्या मागील बाजूच्या भागातील समुद्रामधील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर लाडघरमधील ६४५ मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे समोर आले असून अजूनही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही. केलेल्या सुरक्षा ऑडिटमध्ये गुहागर शहरात येणार्‍या रानवी गुहागर, मोडकाघर गुहागर, गुहागर कोर्ट कीर्तनवाडी व शिवाजीचौक मार्ग यांची पाहणी करून कनेक्टीव्हीटी निश्चित करण्यात आली. गुहागर समुद्रकिनार्‍यावर जाणारे सर्वच मार्ग तपासणी करण्यात आली असून यातून ६ मार्ग निश्चित केले जाणार आहेत. प्रमुख मंदिरे पोलीस परेड मैदान यांची पाहणी केली. सलग ७किलोमीटरच्या या किनार्‍याची सध्याची जागेची पातळी तसेच समुद्रकिनार्‍यालगत असलेली गुहागर नगर पंचायतची जागा पाहण्यात आली. पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहाची जागा, विविध खाद्याचे स्टॉल उभारणीसाठी दोन ते तीन जागांची पाहणी केली गेली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button