
सामर्थ्य सेवा संस्थेच्या दिवाळी शिबिरातून मुलींमध्ये आत्मविश्वासाचा उजेड
ग्रामीण भागातील शिक्षण आणि संस्कारासाठी कार्यरत
आजच्या युगात मुलींना स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि सद्विचारांची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने सामर्थ्य सेवा संस्था (रजि.) यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी सुट्टी एकत्रीकरण २०२५’ या निवासी शिबिराचा सांगता समारंभ २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता निगुंडळ येथे उत्साहात पार पडला.
शिबिराची सुरुवात सहभागी मुलींच्या मनमोहक दीपनृत्याने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण २५ मुलींनी सहभाग घेतला होता. या काळात मुलींना योगाभ्यास, बौद्धिक विकास, पारंपरिक खेळ, रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा यांसह विविध उपक्रमांतून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.
एकतेचा संदेश देणारी मुलींची नाटिका आणि नयन केंबळे, रिषभ मुकनाक, शुभम शिरकर, सार्थक शिरकर, निष्णात ताम्हणकर या छोट्या मुलांनी तयार केलेला मल्हारगड प्रतिकृती हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. शिबिराचे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापक व सचिव सौ. प्रज्ञा ताम्हणकर यांनी केले. तर यामध्ये सहभागी विद्यार्थिनींना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी योगा शिक्षक विश्वास शिर्के, सचिन येवले, तसेच विविध खेळांतून आपले बुद्धीकौशल्य विकसित करण्यासाठी अवधूत समगिस्कर यांनी विशेष मार्गदर्शन केले. सहभागी मुलींनी आपल्या वक्तृत्वातून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरविंद धामणस्कर, सदस्या रंजना धामणस्कर, निगुंडळ गावच्या सरपंच दीप्ती गिजे, पोलिस पाटील प्रकाश आंबोकर, संतोष धामणस्कर गुरुजी, ग्रामस्थ व पालक संदीप केंबळे व सौ. केंबळे, वडद गावचे उपसरपंच संदीप धनावडे, मार्गताम्हाणे येथील योगा शिक्षक विश्वास शिर्के सर, शिष्य सचिन येवले, तळवली गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रदीप चव्हाण आणि उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सामर्थ्य सेवा संस्था (रजिस्टर) ही ग्रामीण भागातील विशेषतः गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत सामाजिक संस्था आहे.
या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून सक्षम, आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडविणे.
संस्थेचे प्रमुख उपक्रम :
सर्वांगीण विकास निवासी शिबिरे : दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मुलींसाठी निवासी शिबिरांचे आयोजन करून शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास साधणे.
निवासी शैक्षणिक सुविधा : शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलींना निवासी शिक्षणव्यवस्था उपलब्ध करून देणे.
गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन : आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक मदत पुरविणे.
प्रज्ञा ताम्हणकर आणि त्यांचे पती महेश ताम्हणकर यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे कार्य प्रभावीपणे पुढे जात आहे. उपस्थितांमधून संतोष धामणस्कर गुरुजी, प्रदीप चव्हाण आणि संदीप धनावडे यांनी मन:पूर्वक आभार मानून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया गिजे हिने केले. प्रास्ताविक प्रज्ञा ताम्हणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पायल धामणस्कर हिने केले.




