
डॉ. संपदा मुंडे प्रकरणी न्यायासाठी शुक्रवारी चिपळूणमध्ये कॅण्डल मार्च
चिपळूण : फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी किंवा विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीकडे वर्ग करावा, या मागणीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी चिपळूण शहरात कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तसेच वूमन्स डॉक्टर्स विंग यांच्यावतीने करण्यात आले आहे. हा कॅण्डल मार्च सायंकाळी सहा वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. या माध्यमातून डॉ. संपदा मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयोजिका तथा Magmo कोऔर्डीनेटर डॉ. कांचन मदार यांनी नागरिक, महिला, युवती, विद्यार्थी आणि सर्व सामाजिक संघटनांना आवाहन केले आहे की, “ही न्यायलढा केवळ एका डॉक्टरसाठी नाही, तर संपूर्ण वैद्यकीय समाजाच्या सन्मानाचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, सोशल मीडियावर ‘जस्टिस फॉर लेडी मेडिकल ऑफिसर’ हा हॅशटॅग जोरदारपणे ट्रेंड होत आहे. चिपळूण शहरातील हा कॅण्डल मार्च महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एकजुटीचा संदेश देणारा ठरणार आहे.
शुक्रवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, महिला वर्ग आणि सुजाण नागरिक बंधू-भगिनींना संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कॅण्डल मार्चमधून डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजिका डॉ. कांचन मदार (समन्वयक, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य व वर्ग एक वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य) यांनी केले असून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव (मॅगमो रत्नागिरी), समस्त आरोग्य विभाग चिपळूण तसेच आयएमए वूमन डॉक्टर्स विंग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.



