
चिपळूणचा पूररेषेचा प्रश्न लवकरच निकाली काढणार सातत्याने आपला पाठपुरावा सुरू-खा. नारायण राणे
चिपळूणचा पूररेषेचा प्रश्न लवकरच निकाली काढणार. याबाबत सातत्याने आपला पाठपुरावा सुरू आहे. लवकरच यावर मार्ग निघेल, असा विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टीका केली.
शहरातील सहकार भवनमध्ये मंगळवारी (दि. 28) सायंकाळी खा. राणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत उपस्थित होते. यावेळी खा. राणे म्हणाले की, चिपळूणमध्ये झालेल्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे आपले प्रश्न मांडले. आता देवरूख व रत्नागिरी येथेदेखील जनता दरबार होणार आहे. चिपळूणच्या पूरप्रश्नासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, चिपळूणचा पूरप्रश्न तसेच लाल व निळी पूररेषा याबाबत अनेकवेळा अनेकांनी आपल्याला निवेदने दिली आहेत. आपण या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहोत. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात अधिक पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना देखील आपण भेटणार आहोत.




