१० नोव्हेंबरनंतर आचारसंहिता? राज्य निवडणूक आयोगाची उद्या बैठक; राज्यातील विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार ‘या’ मुद्द्यांची माहिती!

सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १० नोव्हेंबरपूर्वी जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरूवारी (ता. ३०) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली आहे. अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील १० दिवसांत निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा पहिला टप्पा होईल. त्याबरोबरच २८९ नगरपालिकांचीही निवडणूक घेता येईल का, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांची निवडणूक होणार हे निश्चित आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळ व ईव्हीएम आणि मतदार याद्यांवरील हरकती व त्यावरील तोडगा, अशा प्रमुख बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेता येईल हे निश्चित होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करणार आहे. ही कार्यवाही ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पण, त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील, असे देखील राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जानेवारीत संपणार १४,२३४ ग्रामपंचायतींची मुदत

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींचा निकाल १८ जानेवारीला जाहीर झाला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ मध्ये संपणार आहे. नव्या निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडला जाईल. ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा टप्पा जानेवारी २०२६ मध्ये होईल. तत्पूर्वी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे.

निवडणुका होणाऱ्या संस्था

जिल्हा परिषदा

३२

पंचायत समित्या

३३१

महापालिका

२९

नगरपालिका-नगरपरिषदा

२८९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button