
दारू पिण्यावरून नातेवाईकांनी हटकल्याच्या रागातून एका ३३ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या
दारू पिण्यावरून नातेवाईकांनी हटकल्याच्या रागातून एका ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याचा रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रत्नागिरी शहरात घडली असून, यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
वैभव विलास पाटील (वय ३३ वर्षे, रा. मुरुगवाडा, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ८.०० वाजण्याच्या सुमारास वैभव पाटील याला घरातील नातेवाईकांनी ‘दारू पिऊ नकोस’ असे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने तात्काळ घरातील वरच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून ढकलून घेतला. त्यानंतर त्याने खोलीतील लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला.
नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वैभव पाटील याला उपचाराकरिता रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी त्याला मृत घोषित केले.



