लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ 

रत्नागिरी : भ्रष्टाचाराच्या समस्येवर मात करून पारदर्शक व नीतिमान महाराष्ट्र घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत विभागातर्फे ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाकडून विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह एक आठवडा आयोजित करण्यात येतो. त्यानुसार २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत लाचलुचपत विभागाकडून “राष्ट्र समृद्धी” ही संकल्पना घेऊन २७ ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेऊन तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

२७ ऑक्टोबरला रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल, जिल्हा परिषद, जेलनाका, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी शहर बसस्थानक, माळनाका येथील पादचारी उड्‌डाणपुल, शासकीय विश्रामगृह, नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी या ठिकाणी दर्शनी भागावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्त्नागिरी कार्यालयाचे टेलिफोन नं. टोल फ्रि नं. वेब साईट, ई-मेल आयडी इत्यादीची माहिती दर्शविणारे फ्लेक्स लावण्यात आले.

रत्नागिरी शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी तसेच रत्नागिरी बसस्थानक येथे तेथील नागरिकांना एकत्र करून त्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना पत्रके वाटण्यात आली. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र (ठाणे) व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक, टोल फ्री क्रमांक, वेब साईट, ई-मेल आयडी आदींची माहिती दर्शविणारे स्टिकर्स सामान्य जनतेला दिसतील असे रत्नागिरी बसस्थानक येथे दर्शनी भागावर चिकटविण्यात आले आहेत.

तसेच चिपळूण येथे शासकीय कार्यालये, बसस्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी जाऊन जनतेला भ्रष्टाचार निर्मूलनाची माहितीपत्रके वाटण्यात आली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक, टोल फ्री क्रमांक, वेब साईट, ई-मेल आयडी आदी माहिती दर्शविणारे स्टिकर्स सामान्य जनतेला दिसतील, असे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर चिकटविले. चिपळूण येथील बसस्थानक, रिक्षास्टँड तसेच गर्दीच्या ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन उपस्थितांना पत्रके वाटण्यात आली.

स्थानिक वृत्तपत्रे, आकाशवाणीद्वारे भ्रष्टाचारविरुद्ध जनजागृती पर संदेश प्रसारीत करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी (०२३५२ २२२८९३) आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button