
रत्नागिरी जिल्ह्याला पुढील काही दिवस यलो अलर्ट!
- रत्नागिरी जिल्ह्यात रोज संध्याकाळी कोसळणाऱ्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या विजांच्या कडकडाटासह पडणा-या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले भात पीक पावसात भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर या वादळी पावसाचा मच्छीमारी व्यवसायावर देखील परिणाम झाल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने देखील जिल्ह्याला २९ ऑक्टोबर पर्यत यलो अलर्ट दिल्याने पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणा-या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेतकरी व मत्स्य व्यवसायाला या पावसाचा जास्त फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेले भात पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच विजाचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे जिल्ह्यातील मस्त्स व्यावसाय पुन्हा ठप्प झाला आहे. मत्स्य व्यवसायिकांनी आपल्या नौका जिल्ह्यातील ठिक ठिकाणी असलेल्या बंदरात नांगरुन ठेवल्या आहेत. ऐन मत्स्य हंगामात मत्स्य व्यावसाय ठप्प झाल्याने मच्छी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. मुंबई येथील प्रादेशीक हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला २९ ऑक्टोबर पर्यत यलो अलर्ट दिल्याने जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दि. २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.




