
नगर परिषदेच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची याचिका फेटाळली
रत्नागिरी नगर परिषदेच्या २ अधिकार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली.
सुमारे ४ वर्षापूर्वी शहरातील मारूती मंदिर येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना मालमत्ता विभागाच्या दोन अधिकार्यांनी छेडछाड किंवा असभ्य वर्तन करून मारहाण केल्याची तक्रार करण्यासाठी भाजी विक्रेती महिला शहर पोलिसांकडे गेली होती. पोलिसांनी तक्रार दाखल न करून घेतल्याने त्या महिलेने न्यायालयात धाव घेवून नगर परिषदेच्या दोन अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
मारूती मंदिर येथे रस्त्याच्या कडेला बसणार्या विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी येथील दुकानदारांनी केली होती. त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. त्यावेळी एका भाजीविक्रेत्या महिलेने कारवाईदरम्यान असभ्य वर्तन आणि मारहाण झाल्याची तक्रार करण्यासाठी शहर पोलिसांकडे धाव घेतली परंतु या आरोपामध्ये तथ्य न आढळल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्या विक्रेत्या महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. या दोन्ही अधिकार्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीच्या न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून अधिकार्यांकडून ऍड. निलांजन नाचणकर यांनी काम पाहिले.www.konkantoday.com




