श्री विठ्ठल मंदिर परिसर विकास आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ..

प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीच्या श्री विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण आणि विकास या भव्य दिव्य कामाचा शुभारंभ सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

   या सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वीच तीन कोटी रुपये विशेष निधी म्हणून नगरपरिषदेकडून मंजूर करून दिले आहे. मध्यंतरीच्या पावसाळी ऋतूमुळे या कामाची सुरुवात थांबली होती. तथापि आता महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या या मंदिराला फार मोठी सामाजिक आणि धार्मिक अशी परंपरा असल्यामुळे सर्वांनाच हा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या मंदिराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिश सरकारने सनद सुरू केली आहे. ब्रम्हदेशचे राजे थिबा यांनी रत्नागिरीमध्ये वास्तव्याला असताना या मंदिराला भेट देऊन आपल्या राजघराण्यातील एक सुंदर असा आरसा भेट दिला आहे. अजूनही तो मंदिराने व्यवस्थित जतन केला आहे.  महसुली गाव राहाटागरची निर्मिती झाली, तिची सुरुवात या मंदिराच्या चतु:सीमा निश्चित करून झाली असल्यामुळे या जागेला क्रमांक एकने नोंदण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिराचा अनेक नेतेमंडळींनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यासपीठ म्हणून उपयोगही केला आहे. 

अशा या दैदिप्यमान प्रति पंढरपूरचा नव्याने साज चढवून भाविकांना, भक्तांना आणि पर्यटकांनाही या मंदिरात भेट देण्याची एकप्रकारे नव्याने संधी प्राप्त व्हावी तसेच जागतिक नकाशावर प्रति पंढरपूरची नव्याने ओळख निर्माण व्हावी, या हेतूने या मंदिराचे सुशोभीकरण आणि विकास करण्याचे निश्चित आणि सुतवाचक केल्यामुळेच उद्या पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते मंदिर परिसरात असंख्य सन्माननीय नागरिक, भक्तमंडळी, विविध समाजातील नामवंत मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणही वेळेवर या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्था रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button